वरणगांव फॅक्टरीतील गवताला भीषण आग – अनर्थ टळला
१४ अग्निशामक दलाने आग अथक प्रयत्नानंतर आणली आटोक्यात , आगीचे कारण गुलदस्त्यात
वरणगांव । प्रतिनिधी
वरणगांव आयुध निर्माणी मध्ये चार वाजेच्या सुमारास सुरक्षेच्या चार आणी पाच नंबरच्या घुमटी जवळ आग लागली होती . आग इतकी भीषण होती कि बाहेरून ९ अग्निशामक दलाची वाहने बोलावण्यात आले होते . यामुळे पुढील अनर्थ टळला तर तिन तासानंतर आग आटोक्यात आली.
वरणगांव आयुध निर्माणीच्या मॅगेझिन विभागाच्या आऊट साईडला असलेल्या चार व पाच क्रमांकाच्या घुमटी जवळ दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली . याची माहिती मिळताच आयुध निर्माणीच्या अग्निशामक पथकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . मात्र, वाढलेल्या तापमानामुळे आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच आयुध निर्माणी प्रशासनाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना याबाबत माहिती दिली . त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील अग्निशामक दलाला सुचना देवून घटनास्थळी रवाना केले . तसेच त्यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देवून आयुध निर्माणीच्या अधिकार्यांसह परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले . यामुळे तिन तासाच्या अथक प्रयत्ना नंतर आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला . तर याबाबत परिसरात उलट – सुलट चर्चेला उधाण आले होते .
या तालुक्यातील अग्निशामक बंब घटनास्थळी
वरणगांव आयुध निर्माणी मध्ये आग लागल्याची सुचना मिळताच भुसावळ, सावदा, रावेर,जळगांव, फैजपूर, दीपनगर, जामनेर , जैन इरिगेशन या ठिकाणाहून आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाची वाहने पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते . तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी याठिकाणी शर्थीचे प्रयत्न करीत होते . जिल्हाधिकारी अमन मित्तल, वनविभागाचे अधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी वरणगांव आयुध निर्माणी येथील घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मिलींद शिंदे यांनी दिली .
दरवर्षी गवताला लागते आग
आयुध निर्माणीच्या संरक्षण भिंतीच्या आत उगवलेल्या गवताला दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या तापमानामुळे किरकोळ स्वरूपाची आग लागते . हि लागलेली आग आयुध निर्माणीच्या अग्निशामक दलाच्या पथकाकडून आटोक्यात आणली जात असल्याने जास्त चर्चा होत नाही . मात्र, यंदा लागलेली आग चर्चेचा विषय ठरला असून आग नेमकी कशामुळे लगाली याचा उलगडा होवू शकला नाही .