शहादा,दि.14
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे रसायनशास्त्र विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: समस्या व उपाय’ या विषयावर विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख तथा वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अविनाश कुंभार यांनी प्रमुख वक्ते म्हणून शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये लागू होणाऱ्या नवीन “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. सध्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीने जरी जोर धरलेला असला तरीही ते पूर्णत्वाला जाण्याच्या मार्गावर अनंत आव्हाने आहेत. राज्य, जिल्हा, तालुका पातळीवरील विविध भागधारकांना तसेच खाजगी क्षेत्राला या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी करून घेणे हे एक अवघड काम आहे. सोबतच क्षमता, तसेच नवीन कल्पना निर्मितीसाठीच्या अनुकूल वातावरणाची कमतरता ही आव्हानेही समोर आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य प्रा. आर. एस. पाटील यांनी भूषविले. त्यांनी यावेळी बोलतांना म्हटले,भारताच्या अफाट लोकसंख्येला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्याद्वारे असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या धोरणाच्या अंमलबजावणीवर ठरणार आहे.असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. एस. राजपूत यांच्यासह उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारिणीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.असोसिएशनच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त कार्यशाळा तसेच सर्व रसायनशास्त्र प्राध्यापक सदस्य यांची वार्षिक सभा घेण्यात आली. दुपारच्या सत्रात असोसिएशनच्या वतीने यंदाचा जीवनगौरव पुरस्कार निवृत्त प्राध्यापक डॉ. ए. एम. नेमाडे यांना देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. तसेच वर्षभरात रसायनशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांनी संपादन केलेल्या यशाबद्द्ल त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नंतर वार्षिक जमा व खर्चाच्या विवरणपत्रावर चर्चा करून आयत्या वेळेचे विषयावर विचार मांडण्यात आले.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सच्या कार्यकारिणी सदस्य व महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.