नवी दिल्ली: युपीए सरकारच्या काळातील प्रसिद्ध घोटाळा असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या साक्षीदाराची हत्या करण्यात आली आहे, अशी शंका ईडीने व्यक्त केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रकुल पुरीच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील न्यायालयाला ही धक्कादायक माहिती दिली आहे.
के.के. खोसला असे साक्षीदाराचे नाव आहे. त्यांचा खून केल्याचा संशय आहे. ते ७३ वर्षांचे असून, गेल्या चार महिन्यांपासून ते बेपत्ता आहेत. तपास यंत्रंणा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असून, त्यांच्या कुटुंबालाही धक्का बसला आहे. खोसला हे पुरी यांच्यासाठी काम करायचे. अनेक व्यवहारात त्यांचा सहभाग होता. त्यांनी ईडीसमोर म्हणणे मांडले होते. त्यात आर्थिक व्यवहारांची माहिती दिली होती. मात्र, काही दिवसांनी त्यांनी आपला जबाब बदलला. तेव्हापासून खोसला बेपत्ता असल्याचे याचिकेवरील सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने सरकारी वकिल डी.पी. सिंह यांनी न्यायालयात सांगितले.
ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारात रकुल पुरी यांनी स्वतःच्या कंपन्यांच्या माध्यमातून लाच घेतली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणाचा ईडी तपास करीत आहे. तपास यंत्रणांच्या रडारवर आलेल्या पुरी यांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे.