आधार शेअरिंग धोकेदायक:ट्रायच्या अध्यक्षांचाच आधार हॅक!

0

नवी दिल्ली-आधार कार्डचा नंबर सार्वजनिक करण्यावरुन गोपनिय माहिती उघड होते असा वारंवार आरोप होतो. यासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल आहे. याच संदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे चेअरमन आर.एस.शर्मा यांनी स्वतःचा आधार क्रमांक शेअर करुन ते हॅक करुन दाखवावे असे आव्हान दिले होते. शर्मा यांनी आपला आधार क्रमांक ट्विटरवरुन शेअर केला. पण हे धाडस त्यांच्या चांगलंच अंगलट आले. कारण, आधार क्रमांक शेअर केल्याच्या थोड्याच वेळात फ्रान्समधील सुरक्षा संशोधक असल्याचा दावा करणाऱ्या इलिअट अल्डरसन याने शर्मा यांची वैयक्तिक माहिती उघड केली.

इलिअट अल्डरसन याने शर्मा यांचे आव्हान स्वीकारले आणि त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाइल क्रमांकच थेट ट्विट केला. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने माहिती हॅक करता येत नाही, असा दावा शर्मा यांनी केला होता. त्यासाठी आपल्या ट्विटरवरून शर्मा यांनी आधार क्रमांक सार्वजनिक केला.

अल्डरसन याने शर्मा यांच्या खासगी जीवनातील अनेक आकडे जाहीर केले. यामध्ये शर्मा यांच्या घराचा पत्ता, जन्मतिथी, फोन क्रमांक इत्यादींचा समावेश आहे. इतकंच काय तर शर्मा यांचे खासगी फोटोही हॅकरने शोधले आणि ट्विट केले.