आलोक वर्मा यांच्या विरोधातील चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा-सुप्रीम कोर्ट

0

नवी दिल्ली- आलोक वर्मा यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याबाबत सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश ए.के.पटनायक यांच्या देखरेखीखाली सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या विरोधातील चौकशी दोन आठवडयात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु असतानाच काँग्रेसचा लोधी रोडवरील दयाल सिंह कॉलेजपासून सीबीआय मुख्यालयापर्यंत मार्च निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआय मुख्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मार्चमध्ये तृणमुल काँग्रेसचे खासदार नदीम उल हक सहभागी होणार आहेत. पोलिसांनी सीबीआय मुख्यालयाच्या दिशेने जाणारा रस्ता बंद केला आहे. दरम्यान सीबीआयचे दुसरे विशेष संचालक राकेश अस्थाना प्रसिद्ध वकिल मुकुल रोहतगी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. रोहतगी अस्थाना यांची बाजू मांडणार आहेत.

आलोक वर्मा यांच्या वतीन फाली.एस.नरीमन युक्तीवाद करणार आहेत. सीव्हीसीकडून तृषार मेहता बाजू मांडणार आहेत. केंद्र सरकारकडून अॅटॉर्नी जनरल के.के.वेणूगोपाल युक्तीवाद करतील. राफेल घोटाळयाची चौकशी रोखण्यासाठी पंतप्रधानांनी सीबीआय प्रमुखांना हटवले असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

सीबीआयमधील संघर्षानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत आणि या यंत्रणेवर नियंत्रण पुनर्स्थापित करण्यासाठी बुधवारी ‘सीबीआय’चे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या दोघांचे अधिकार काढून घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. या निर्णयाविरोधात वर्मा यांनी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.