अलोक वर्मा यांच्या समर्थनार्थ कॉंग्रेसचे आज आंदोलन

0

नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याच्या प्रकरणाविरोधात आज नवी दिल्लीतील मुख्यालयासह देशातील कार्यालयांसमोर काँग्रेस निदर्शने करणार आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहभागी होणार असून या आंदोलनात आता तृणमूल काँग्रेसनेही सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादामुळे आता राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाचखोर अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न तसेच राफेल खरेदी घोटाळ्याची चौकशी थांबविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने काल केला होता. तसेच गुरुवारी सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांच्या घराबाहेर इडीचे अधिकारी पाठवून हेरगिरी करत असल्याचा आरोपही केला होता.

या विरोधात काँग्रेसने आज, शुक्रवारी सकाळी सीबीआयच्या मुख्यालयासह देशातील कार्यालयांसमोर निदर्शने करणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभुमीवर दिल्ली पोलिसांनी सीबीआय मुख्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच या आंदोलनाला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून तृणमूलचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभाग होणार आहेत.