आमीर खानची भेट न झाल्याने चाहत्याकडून आत्महत्येचा प्रयन्त

0

मुंबई : बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्याला भेटण्यासाठी अनेकांची मोठी धडपडही सुरु असते. आमिरच्या एका चाहत्याने आमिरची भेट न झाल्यामुळे त्याच्या मुंबईतील ऑफिसबाहेरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

मोहम्मद कासिम असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ३३ वर्षीय मोहम्मद कर्नाटकातील बेळगाव येथील राहणारा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो आमिरच्या भेटीसाठी प्रयत्न करत होता. मोहम्मदने आमिरच्या मुंबईतील ऑफिसबाहेर आमिरला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु बाहेर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले आणि आमिरला भेटण्याची परवानगी दिली नाही. आमिरला भेटण्याची परवानगी नाकारल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या खिशातून एका द्रव पदार्थाची बाटली काढून त्याचे प्राशन केले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गेल्या अनेक दिवसांपासून आमिरच्या भेटीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगतिले. परंतु अनेक प्रयत्न करुनही तो आमिरला भेटू शकत नव्हता. त्यामुळे हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगतिले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली असून त्याला कुटुंबियांकडे सोपावण्यात आले आहे.