प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना लवकरच योग्य मोबदला देणार : ना. जयंत पाटील यांची ग्वाही

चाळीसगाव। तालुक्यातील धरणग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनीबाबत अधिवेशनात तरतूद करून लवकरच योग्य तो मोबदला देण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आयोजित बैठकीत दिली. यावेळी माजी मंत्री आ.गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, संजय पाटील यांच्यासह पीडित शेतकरी उपस्थित होते.

 

चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव, मुंदखेडा, कोदगाव व ओढरे येथील शेतकर्‍यांच्या जमिनी सरकारने कवडीमोल भावाने खरेदी केल्या आहेत. यामुळे शेतकर्‍यांवर अक्षरशः अन्याय झाला आहे. दरम्यान प्रकल्पग्रस्त व शासनाच्या समनव्यातून मध्यममार्ग काढत टप्याटप्प्यात निधी देण्याचे ठरले होते. या बदल्यात शेतकर्‍यांनी आपले कोट्यवधीचे व्याज शासनाला सोडले होते. मात्र, नंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि गेल्या दोन वर्षात ठरल्याप्रमाणे शेतकर्‍यांना एक रुपयाही शासनाने दिला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली. त्यांनी जळगाव येथे आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाला माजी जलसंपदामंत्री गिरीष महाजन व जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी यांनी भेट दिली. आ.गिरीष महाजन यांनी थेट जलसंपदा मंत्र्यांना फोन करून आमरण उपोषणाची माहिती दिली. त्याअनुषंगाने धरणग्रस्त शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी आ.गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, पंचायत समिती गटनेते संजय पाटील यांच्यासह पीडित शेतकर्‍यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन बैठकीचे आयोजन केले.

 

बैठकीत धरणग्रस्त शेतकर्‍यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे व्यथा मांडली. दरम्यान या समस्यांवर मार्ग काढून कशाप्रकारे योग्य मोबदला देता येईल, यासाठी आ.गिरीष महाजन, आ.मंगेश चव्हाण, पं.स.चे गटनेते संजय पाटील आणि शेतकर्‍यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केली. यामुळे सुचविलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल. येत्या अधिवेशनात तरतूद करून लवकरच योग्य तो मोबदला देण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तत्पूर्वी आढावा पूर्ण करून नियोजन विभाग आणि अर्थ विभागाशी बैठक करून शेतकर्‍यांना मोबदला देण्याची सोय करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्र्यांनी दिली. तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतर बैठक पार पडली. तत्पूर्वी तात्काळ उपाययोजना म्हणून पुरवणी मागणी मांडून 280 कोटी रुपये तापी महामंडळास उपलब्ध करून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा शब्दही जलसंपदा मंत्र्यांनी दिला.

 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव पाटील, पातोंडा येथील प्रभाकर पवार, छोटू पाटील, जितेंद्र येवले, सुखदेव शिंपी, मुरली अहिरे, गजानन माळी, दिलीप पाटील, पांडुरंग माळी, अशोक वाबळे, बी.ओ.पाटील, चितेगाव येथील निवृत्ती अण्णा कवडे, राजेंद्र कवडे, भगवान भोसले, रवींद्र होनसिंग पाटील आदी उपस्थित होते.