मुंबई: आरे मेट्रो कारशेड प्रकरणी वृक्षतोडीविरोधातील याचिका काल शुक्रवारी हायकोर्टाने फेटाळली. त्यामुळे वृक्षतोडीचा मार्ग मोकळा झाला. मात्र याला पर्यावरण प्रेमींचा विरोध होता. दरम्यान कोर्टांच्या निर्णयानंतर काल रात्रभर वृक्ष तोडण्यात आली. रात्रीतून जवळपास साडेतीनशेहून अधिक झाडे कापण्यात आले आहे. पर्यावरण प्रेमींना याची माहिती कळताच त्यांनी ‘आरे’मध्ये धाव घेतली. यामुळे ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचे वातावरण होते. याठिकाणी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
आज आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेना प्रवक्ते प्रियांका चतुर्वेदी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल संध्याकाळपासून परिस्थिती तणावात आहे.
आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल लागताच संध्याकाळी सातच्या सुमारास झाडे कापायला सुरुवातही झाली. रात्रीच्या अंधारात वृक्ष तोड करण्याचा प्रकार फार काळ लपू शकला नाही. पर्यावरण प्रेमी आणि ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या आंदोलकांना याचा सुगावा लागला. आणि शेकडोंच्या संख्येने त्यांनी आरेत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला.