बलात्कारप्रकरणी आसाराम बापू दोषी

0

जोधपूर – गेल्या साडेचार वर्षापासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये आसाराम बापू अटकेत आहे. याबाबत बुधवारी २५ रोजी जोधपुर न्यायालयात सुनावणी होती. त्यात आसाराम बापू यांना दोषी धरण्यात आले आहे. त्यांच्यासह शरद आणि शिल्पी यांनाही दोषी ठरविण्यात आले आहे. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले आहे. एकूण पाच आरोपींबाबत कोर्टाने बुधवारी निकाल दिला. 6 नोव्हेंबर 2013 रोजी पोलिसांनी आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. आसारामविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत, जुवेनाईल जस्टिस्ट अर्थात अल्पवयीन न्याय आणि आयपीसीच्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कडक सुरक्षा व्यवस्था

हा निकाल येण्याआधीच अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्लीपासून जोधपूरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली होती. राम रहीमचा निकाल आल्यानंतर ज्याप्रकारे त्याच्या अनुयायांनी दिल्लीसह अनेक ठिकाणी हैदोस घातला, तशीच परिस्थिती यावेळीही होण्याची शंका पोलिसांना आहे. आसाराम दोषी ठरल्यास त्याचे समर्थक गोंधळ घालू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती 16 वर्षांची होती.

शिक्षेविरोधात याचिकेची श्यक्यता

केंद्रीय कारागृहाकडून विशेष कोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर त्यांचे वकील गुरुवारी राजस्थान उच्च न्यायालात शिक्षेविरोधात याचिका करु शकतात. निर्णयाची प्रत मिळायला उशीर लागतो आणि वकिलांना त्याचा अभ्यास करण्यासाठी देखील वेळ लागेल त्यामुळे शुक्रवारी वकील कोर्टामध्ये याचिका दाखल करतील असं बोललं जातंय. शनिवारी कोर्ट बंद असल्याने आसाराम यांच्या शिक्षेविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी होईल. याआधी आतापर्यंत 12 वेळा आसाराम यांचा जामीन अर्ज ट्रायल कोर्ट, राजस्थान हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे.

वडिलाची प्रतिक्रिया
आसाराम दोषी ठरल्याने आम्हाला न्याय मिळाला आहे. या शिक्षेद्वारे या प्रकरणातील ज्या साक्षीदारांची हत्या झाली तसेच जे बेपत्ता आहेत त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा पिडीत मुलीच्या वडिलांनी केली आहे.