लाहोर : दक्षिण आफ्रिकेचा माजी धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार आहे. डिव्हिलियर्स लाहोर येथे लाहोर कलंदर्स संघाकडून दोन सामने खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर मझांसी सुपर लीगमध्ये खेळल्यावर त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ९ व १० मार्चला डिव्हिलियर्स खेळणार आहे.
पाकिस्तान सुपर लीगचे बहुतांश सामने अरब अमिरातीमध्ये होणार आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डने काही सामने पाकिस्तानमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडूंची फटकेबाजी पाहण्याचा आनंद मिळणार आहे. डिव्हिलियर्सने २००७ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर तब्बल ११ वर्षांनी तो पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार आहे.