गर्दीच्या वेळेस रेल्वे प्रवाशांची सोनसाखळी पळविणार्‍या आरोपीस अटक

0

मुंबई – गर्दीच्या वेळेस रेल्वे प्रवाशांची सोनसाखळी पळविणार्‍या एका रेकॉर्डवरील आरोपीस काल अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. इब्राहिम हनीफ शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इब्राहिम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सोळाहून अधिक सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले.

पश्‍चिम रेल्वे हद्दीत गेल्या काही दिवसांत सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. अज्ञात चोरटे गर्दीचा वेळेस ही चोरी करीत होते. त्यामुळे अंधेरी रेल्वे पोलिसांनी अशा आरोपींविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्यासह त्यांच्या पथकाने सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस रेल्वे स्थानकात विशेष मोहीम सुरु केली होती. दोन दिवसांपूर्वी सकाळी साडेदहा वाजता एक तरुण गर्दीच्या वेळेस पुढच्या एका प्रवाशाची सोनसाखळी चोरी करुन पळून जात होता. हा प्रकार तिथे गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी पाठलाग करुन त्याला शिताफीने अटक केली. चौकशीत त्याचे नाव इब्राहिम शेख असल्याचे उघडकीस आले. तो ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरात राहत असून सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध सोळाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या अटकेने सोनसाखळी चोरीच्या अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.