वाराणसी – उत्तरप्रदेशमध्ये वाराणसी उड्डाणपूल दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यानाथ यांनी दिली आहे. मंगळवारी वाराणसीतील उड्डाणपूलाचे दोन खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत १८ लोकांचा जीव गेला आहे, तर ११ लोक गंभीर जखमी झाले आहेत. यात अनेक लोक जखमी झाले, तर अनेक लोक मलब्याखाली अडकले. ही घटना सायंकाळी सर्वाधिक वाहतूक असण्याच्या वेळी घडली. दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबाना मदतीची घोषणा करत कबीर चौरा रुग्णालयात जखमींची व कुटुंबियांची भेट घेतली.
व्यक्तिगत लक्ष देण्याच्या सूचना
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात प्राथमिक कारवाई केली आहे. यावेळी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री मौर्या यांना आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांना मदतकार्यात व्यक्तिगत लक्ष देण्यास सांगितल्याचेही नमूद केले.
मदतीची घोषणा
दुर्घटनेनंतर आदित्यनाथ यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख आणि जखमींच्या कुटुंबियांना २ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे. संबंधित उड्डाणपुलाचा व्यवस्थापक के. आर. सुदान यांनी सांगितले, की दुर्घटनेमागील कारण तपासानंतरच सांगता येईल.