अमळनेर: पालिकेच्या भागीदारीत असलेले प्रथमेश इंटरप्रायजेसला अमळनेर नगरपालिका तर्फे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे (आर.ओ) प्लांटचे काम देण्यात आले होते. या कामात संबंधित ठेकेदाराने पाण्याची उपलब्धता स्वतः करायची होती. ठेकेदाराने कराराचे उल्लंघन करत मुख्य जलवाहिणीतून कनेक्शन घेतल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पाणीपुरवठा अभियंता हर्षल सोनवणे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता त्यांना अवैध कनेक्शन आढळले.
आरोग्य सभापती संजय भिल यांनी खोदून ठेकेदाराने घेतलेले अवैध कनेक्शन दाखवल्याने उपस्थित कर्मचारी अवाक झाले. जीवनधारा प्लांट न.पा.ने सील केले. मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी देखील हजर होते. या वेळी रवींद्र पाटील, शीतल यादव, सुरेश पाटील, आरोग्य सभापती संजय भिल, संतोष पाटील, महेश पाटील, साखरलाल महाजन, शाम पाटील, प्रवीण पाठक, सलीम टोपी, संतोष लोहेरे, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव, सिधि समाज अध्यक्ष गोविंदराम आहुजा, दिलीप सिंधी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
"मी जीवनधारा या कंपनीचे सिंधी कॉलनीतील कार्यालयात गेली असता तेथे अमळनेर पालिकेची कुठलीही परवानगी न घेता पालिकेच्या जलवाहिणीतून अवैध कनेक्शन घेतलेले आढळून आले ज्याची कुठलीही परवानगी पालिकेने दिलेली नसल्याने अगोदर ते कार्यालय सील केले आणि त्या ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले आहे".
शोभा बाविस्कर
मुख्याधिकारी न प अमळनेर