जुन्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
अडावद ता चोपडा (प्रतिनिधी)- गावातील ग्रामपंचायतची जीर्ण इमारत पाडणे सुमारे एक महीन्यांपासुन रखडल्याने अंगणवाडीतील चिमुकल्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. या इमारतीचे वरचा एकच मजला पाडण्यास सुरुवात झाली. त्यानुसार एक खोली पाडली देखिल पण अचानक काम बंद पडल्याने ती जीर्ण इमारत कधीही कोसळू शकते. यामुळे या परिसरात वावरणार्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
गावातील ग्रामपंचायत इमारत मागील गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेली होती. इमारतीच्या भिंतींना मोठमोठे तडे पडलेले असल्याने याठिकाणी जातांना नागरिक जीव मुठीत धरून जात होते. तर खालच्या मजल्याला लावण्यात आलेले लाकडाचे सरे देखील जीर्ण झाल्याने ते आता पडायला सुरुवात झाली होती. यामुळे ग्रामसभेत जीर्ण इमारत पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार जीर्ण इमारत पडण्यासाठी ग्रामपंचातीने दि ३ मार्च २०१८ रोजी इमारत पाडण्याविषयी प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्याकडे सादर करून त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे जीर्ण इमारत पाडण्यासाठी मंजुरी मिळाली होती. इमारत पाडण्यास सुरुवात देखील करण्यात आली. पण याठिकाणी गावातीलच काही राजकीय पुढार्यांच्या हस्तक्षेप होत असल्याने इमारत पडण्यास विलंब होत असून यामुळे मात्र अंगणवाडीत जाण्यासाठी लहान मुलांना याच ठिकाणाहून जावे लागत असल्याने अपूर्णावस्थेत पडलेल्या या इमारतीचा धोका निर्माण झाला आहे.
अंगणवाडीतील पाल्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण
या ठिकाणाहून रहदारी करणार्या नागरिकांना व परिसरातील रहिवासी व दुकानदार व्यापार्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. परंतु गावातील राजकीय पुढार्यांच्या हस्तक्षेपामुळे इमारत पडण्यास विलंब होत असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र नाराजी दिसून येत आहे. अपूर्णावस्थेत पडलेल्या इमारतीचा स्लब कोसळला तर काहीही अप्रिय दुर्घटना झाल्यास याला कोण जबादार राहणार? अशी चर्चा होत आहे. ग्रापंचायतीची जुनी इमारतीचा पडण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी जोर धरत आहे.
ग्रामसेवकास अपूर्ण माहीती
ग्रामपंचायत इमारत पाडणे बंद का झाले असा प्रश्न येथिल ग्रामविकास अधिकारी माणिक पाटील यांना विचारला असता त्यांना देखिल पूर्ण माहीती सांगता आली नाही. इमारत कोणत्या कारागीरांना व कोणत्या पद्धतीने पाडण्यास दिली आहे,यापैकी काहीच माहीती नसल्याचे समोर आले आहे. यामुळे हे ग्रामसेवक फक्त धनादेशावर सही करण्यापुरते आहेत की काय ? असाही प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे.
पाच तारखेपर्यंत पूर्ण इमारत पाडणार !
ग्रामपंचायत इमारतीचे साहीत्य मौल्यवान आहे. साहीत्य ठेवायची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. तसेच तेथे असलेल्या व्यायाम शाळेचे साहीत्यही इतरत्र हलवुन येत्या पाच तारखेपर्यंत पूर्ण इमारत पाडणार.
किर्ती पाटील
सरपंच धानोरा
जीव मुठीत धरुन वापर करावा लागतो.
ग्रामपंचायत ची पडकी इमारत अपूर्ण अवस्थेत पाडणे अचानक बंद झाले.यामुळे कधीही इमारतीचा कोणताही भाग कोसळु शकतो.मला व आमच्या अंगणवाडीतील मुलांना जीव मुठीत धरुन ये जा करावी लागते.
लतिका सोनवणे
अंगणवाडी मतदनिस