डॉ. युवराज परदेशी
मोबाइल आणि इंटरनेट या दोन गोष्टी आज अतिशय महत्त्वाच्या झाल्या आहेत. तितक्याच त्या घातकही ठरत आहेत. मोबाइलच्या गरजेचे रुपांतर व्यसनात कधी झाले हे आपल्याला कळलेच नाही. लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्पपरिणाम दिसायला लागले आहेत. स्मार्टफोनवर आपला खूपच वेळ जातो. तंत्रज्ञान वापराचा समतोल आपल्याला राखता येत नाही. माणसाच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सोयीच्या व्हाव्यात यासाठी तंत्रज्ञान विकसित होत गेले आहे. त्यात नवनवीन शोध, प्रयोग होत ते आता प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले आहे. तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य सोपे केले. पण त्याचा अतिवापर, अतिरेक माणूस करत असेल तर तो तंत्रज्ञानाचा दोष नाही. याच तंत्रज्ञानातला मोबाइल त्यातही स्मार्टफोन हा महत्त्वपूर्ण घटक आहे. पुर्वी टीव्ही शाप की वरदान हे निबंधाचे विषय असायचे आता मोबाईल शाप की वरदान यावर लिहीले जावू लागले आहे. स्मार्टफोन हा सध्या माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला असून अनेकांना त्याचे व्यसनच लागले आहे. स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी गुगलने चक्क पेपर फोन आणला आहे.
सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे, असे म्हणतात. परंतु प्रत्येक जण या तंत्रज्ञानाच्या अधीन होत चाललाय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण होत चालली आहे. यात मोबाइलने तर सर्वांना केवळ भुरळच घातली नाही तर चक्क वेडे केले आहे. स्मार्टफोन हा जणू आयुष्याचा अविभाज्य भाग असल्यासारखे आपण सर्व जण वागत असतो. केवळ संपर्क साधण्यासाठी तयार केलेल्या या यंत्रावर प्रत्येक जण अवलंबून झाला आहे. स्मार्टफोन वापरण्याची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात. फोन करणे, फोटो काढणे, गाणी ऐकणे, इंटरनेट सर्फिग, चॅटिंग करणे, गेम्स खेळणे, व्हिडीओ बघणे, शेअर मार्केट, बँकींगपासून हेल्थचेक पर्यंत अनेक मोबाइल वापरण्याची कारणे आहेत. पण हीच कारणे मोबाइलच्या अतिवापराची निमित्तंही ठरत आहेत. एक अहवालानुसार सध्या 125 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात तब्बल 49 कोटी लोक स्मार्टफोनचा वापर करत असून 2022 पर्यंत हा आकडा 85 कोेटीच्या वर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एका संशोधनानुसार, मोबाइल वापरण्याचे सर्वाधिक प्रमाण तरुणांचे आहे. तरुण वर्ग दिवसातले कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त आठ तास मोबाइलवर असतो. पण खरे तर तज्ज्ञांच्या मते हे प्रमाण 20 मिनिटे इतकेच असायला हवे. एखादा मुलगा आठ तास मोबाइलवरच असेल तर उरलेल्या 16 तासांमध्ये अभ्यास किंवा काम, विश्रांती, झोप, कुटुंबासमवेत वेळ, मित्रपरिवारासोबत गप्पा, वाचन, सिनेमा बघणे अशा अनेक शक्य नाही. शिवाय यात पुरेशी झोप झाली नाही तर त्या व्यक्तीचे दुसर्या दिवशीचे वेळापत्रक कोलमडून जातेच, हे सांगायला कुण्या तज्ञाची गरज नाही. लहानपणापासून मोबाइलची सवय लागल्याने मुलांमध्ये हट्टीपणा वाढतो. याचा परिणाम शिक्षणावर होसून ही मुले अभ्यासातही मागे पडतात. कोणाशीही सुसंवाद करत नाहीत आणि खेळीमेळीने राहत नाही. पब्जीसारखे ऑनलाइन मोबाइल गेम खेळताना ते त्यात इतके गुंतले जातात की त्यांचे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागते. या व्यसनामुळे काहींनी आपला जीव देखील गमावले आहेत. मोबाइलच्या अतिवापराने कान व डोळ्यांचे आजार होऊ शकतात. यात चष्मा लागणे, कमी दिसणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, कानाचे मशिन लागणे आदी प्रकारचे त्रास होऊ लागतात. त्यामुळे मोबाइलचा अति वापर टाळणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त सतत एका जागी बसून गेम खेळत राहिल्याने लहान वयातच पाठ दुखी, कंबर दुखी, स्थूलपणा यासारखे आजार झाल्याचे दिसून येते. एकविसाव्या शतकात मोबाईल काळाची गरज बनली असून हे छोटेसे यंत्र बरच काही करू शकते, जर आपण त्याचा नीट वापर केला तरच. नाही तर कठीण प्रसंग उद्भवतात. चीन, कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये यावर उपचार करण्यासाठी वेगळी व्यसनमुक्ती केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, तर भारतातही तीच वेळ आली आहे. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात यावर उपचार केले जातात. मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया अशांचा चांगला आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापर नक्कीच केला जाऊ शकतो. आणि बरेच लोक याचा अशा प्रकारे वापर करतातही. ‘अति सर्वत्र वर्जयेत’ नुसार त्याचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम दिसून येतातच. या समस्येवर गुगलने शोधलेले अनोखे उत्तर प्रचंड अफलातून आहे. पेपर फोन हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला ओपन सोर्स अॅप आहे. या अॅपचा वापर कुठेही केला जाऊ शकतो. हा अॅप स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी मदत करतो. मायक्रोसॉफ्टची सहयोगी कंपनी व जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या गिटहब वर या अॅपचा कोड उपलब्ध आहे. पेपर फोन अॅपमध्ये आपल्याला संपर्क क्रमांक, मॅपसारख्या आवश्यक गोष्टी समाविष्ट करता येतात. यापैकी ज्या कुठल्या गोष्टीचा वापर आपल्याला करायचा आहे, त्या गोष्टीची प्रिंट पेपर फोन अॅप काढतो. पेपर फोनचा मुख्य हेतू लोकांना स्मार्टफोनपासून दूर ठेवणे हा आहे. हा अॅप युजर्सना जास्तीत जास्त कामे पेपरच्या माध्यमातून करण्यासाठी प्रवृत्त करतो. स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी गुगलचा पेपर फोन किती व कसा उपयोगी ठरेल याचे उत्तर आगामी काळात मिळेलच. स्मार्टफोनवर आपला खूपच वेळ जातो. तंत्रज्ञान वापराचा समतोल आपल्याला राखता येत नाही, याची जाणीव अनेकांना असते. मात्र, हा समतोल कसा राखायचा याचे उत्तर त्यांच्याकडं नसते. पेपर फोन अॅप हे त्यावरील उत्तर आहे. पेपर फोन आपल्या गरजेनुसार पर्सनल बुकलेट प्रिंट करून देतो. त्यामुळे आपल्याला डिजिटल जगापासून लांब राहता येते. हा छोटासा प्रयोग लोकांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आपले जीवन सुलभ बनविण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आता तेच तंत्रज्ञान आपल्यावर इतके हावी झाले आहे की त्यापासून सुटका मिळविण्यादेखील तंत्रज्ञानाची गरज भासत आहे.