काबुल – येथील शाश दरक परिसरात झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बस्फोटात २० जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकापाठोपाठ एक असे दोन बॉम्बस्फोट झाले. यात एजन्स फ्रान्स प्रेस (एएफपी)चे पत्रकार, छायाचित्रकार शाह मराई यांच्यासह २ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी अद्याप घेतलेली नाही.
काबुलचे पोलीस विभागाचे प्रवक्ते हशमत स्तानिकझाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट दुचाकीवर तर दुसरा जमिनीवर झाला. मागील आठवड्यात झालेल्या स्फोटात ५२ जणांचा मृत्यू झाला होता तर १००हून अधिक जखमी झाले होते. मतदारनोंदणी केंद्राजवळ झालेल्या गर्दीचा फायदा घेत आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. इस्लामिक स्टेट (आयएस)ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. दरम्यान, मागील काही महिन्यांत अफगाणिस्तानातील काबुलमध्ये शक्तीशाली स्फोटांची मालिकाच सुरू असून यात जवळपास २०० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.