काबूलः अफगाणिस्तानमधील पूर्व नांगरहार प्रांताची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये एक आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे. या आत्मघातकी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी आहे. या हल्ल्यात दहशतवाद्याने पोलिसांच्या चौकीजवळ स्वतःला उडवून घेतले आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अफगाणिस्तानच्या सैन्यावर दररोज तालिबान आणि इसिसच्या दहशतवाद्यांकडून हल्ले केले जातात. या हल्लेखोरांच्या निशाण्यावर सैन्य आणि पोलीस कर्मचारी होते, असे नांगरहार प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते अताहुल्लाह खोगयानी म्हणाले आहेत. जलालाबाद या प्रांतात तालिबान आणि इसिसचे दहशतवादी सक्रिय आहेत. हा इसिसचा गडही समजला जातो. अफगाणिस्तानमध्ये शांती नांदावी, यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वीच देशातल्या विविध तुरुंगातून 490 तालिबानी कैद्यांची सुटका करण्यात आली होती.