नवी दिल्ली-पाकिस्तानी जेलमध्ये ३६ वर्ष घालवल्यानंतर भारतीय असलेले गजेंद्र शर्मा पुन्हा आपल्या घरी जयपूरला परतणार आहेत. त्यांची १३ ऑगस्टला सुटका केली जाणार आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी कुटुंबाला त्यांच्या सुटकेची माहिती दिली.
गजेंद्र शर्मा यांनी १९८२ मध्ये जेव्हा घर सोडले होते. तेव्हा त्यांचे वय ४० वर्ष होते. त्यांचे लग्न झालेले होते. त्यांना दोन मुलंही होती. आता जेंव्हा ते ३६ वर्षानंतर घरी परतणार आहे तेंव्हा त्यांच्यी वाट हे नातवंड पाहणार आहे. गजेंद्र शर्मा जयपूरमध्ये मजुरीचे काम करायचे. मे २०१८ मध्ये ते लाहोरमधील कोट लखपत कारागृहात असल्याची माहिती मिळाली होती.
शर्मा यांची पत्नी मखनी देवी आणि मोठा मुलगा मुकेश यांनी दिल्लीत जाऊन व्ही के सिंग यांची भेट घेत सुटकेची मागणी केली होती. गजेंद्र शर्मा घऱी परतल्यानंतर मोठे जल्लोष करण्यात येणार असून संपुर्ण गावासाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्याचा बेत कुटुंबाने आखला आहे.
जयपूरचे खासदार रामचरन बोहरा यांनी ‘वृत्तपत्रांमधून आम्हाला ते पाकिस्तानमधील कारागृहात असल्याचे समजले. पण त्यांना कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आली होती हे समजू शकले नाही. कुटुंबाने माझ्याकडे मदत मागितली. त्यांना दोन महिन्यांचीच शिक्षा झाली होती, पण वकील न मिळाल्याने त्यांना ३६ वर्ष कारागृहात घालवावी लागली’ असे सांगतिले.