अखेर राम कदमांनी मागितली माफी !

0

मुंबई- घाटकोपरला दहीहंडी कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम यांनी एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’, असे विधान केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. संपूर्ण राज्यभरात त्यांच्यावर टीका केली जात आहे. अखेर आमदार राम कदम यांनी माफी मागितली आहे. आज गुरुवारी राम कदम यांनी ट्विटरवरुन महिलांची माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान केले. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदम यांनी म्हटले होते. राम कदम यांचे हे विधान वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर प्रसारित होताच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. विविध राजकीय पक्षांसह महिला संघटनांनीही राम कदम यांच्या विधानाचा निषेध केला. राज्याच्या महिला आयोगाने कदम यांना नोटीसही बजावली.