नवी दिल्लीः रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी सर्वात श्रीमंतांच्या यादीत पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकाविला आहे. फोर्ब्स इंडिया मॅगझिनने 2019मधल्या श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 51.4 अब्ज डॉलरची संपत्तीसह मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. उद्योगपती असलेल्या गौतम अदानींची प्रगती मात्र वाखाणण्याजोगी आहे कारण त्यांनी यंदा आठव्या स्थानावरून दुसरा स्थानावर झेप घेतली आहे. गौतम अदानींची एकूण संपत्ती 15.7 अब्ज डॉलर आहे.
एअरपोर्टपासून डेटा सेंटरपर्यंत प्रत्येक व्यवसायामध्ये केलेल्या प्रयोगामुळेच अदानी यशस्वी झाले आहे. या यादीत 100 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. 14 श्रीमंतांच्या संपत्तीत 1 अब्ज डॉलरची घट आलेली आहे. गेल्या वर्षी या यादीत 9 अब्जोपती या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. उद्योगपती अजीम प्रेमजींच्या संपत्तीतही घट झाली असून, मार्चमध्ये त्यांच्या संपत्तीत घसरण आली आहे. त्यांनी मार्चमध्ये संपत्तीचा मोठा भाग दान केलेला आहे. त्यामुळेच या यादीत ते दुसऱ्या स्थानावरून 17व्या स्थानावर गेले आहेत.