शहाद्यात अग्रवाल डायनिंग हॉलला आग

शहादा प्रतिनिधी ।

शहरातील बस स्थानक परिसरातील एका तीन मजली इमारतीमधील अग्रवाल डायनिंग हॉलला बुधवारी, १० मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आग लागली. शहादा पालिकेचे अग्निशमन दल तात्काळ पोहचल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शहादा शहरातील बस स्थानक परिसरातील एका तीन मजली इमारतीला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इमारतीचा तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अग्रवाल डायनिंग हॉलमध्ये अचानक धुराचे लोळ दिसू लागल्याने परिसरात एकच धावपळ सुरू झाली होती. त्यानंतर आगीने क्षणार्धात भीषण स्वरूप धारण केले होते. तिसऱ्या मजल्यावर सर्वत्र आग पसरली होती. मात्र, शहादा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.