कृषिमंत्री असताना शरद पवारांचा शेतकऱ्यांऐवजी क्रिकेटवर डोळा

0

पवारांची नियत खोटी असल्याचा पाशा पटेल यांचा आरोप

मुंबई : दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेऊन आयपीएलमध्ये गुंतलेले शरद पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा घृणास्पद प्रकार करत असल्याची टीका करत शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणाऱ्या शरद पवारांचीच नियत खोटी आहे, असा टोला राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी लगावला आहे.

शेतकऱ्यांच्या संपाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्यावर बोलताना पाशा पटेल म्हणाले कि, सध्याच्या सरकारची नियत कशी आहे, याचे मोजमाप करण्यापूर्वी शरद पवार यांनी आपण इतकी वर्षे शेतकऱ्यांच्या नावाने मते मिळवून सत्ता भोगली तरी शेतकऱ्यांची अवस्था अशी का झाली, याचे आधी उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. शरद पवार देशाचे कृषीमंत्री झाल्यावर राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती २००४ नंतर अधिक वाईट झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरद पवार जवळजवळ पन्नास वर्षे सत्तेत होते. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री होते. पंधरा वर्षे त्यांच्या पक्षाचे राज्यात आघाडी सरकार होते. या काळात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रभावी उपाय झाले नाहीत म्हणून शेतकरी रस्त्यावर आला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांच्या मतांच्या आधारावर सत्ता गाजवायची आणि जमिनी बळकावायच्या एवढाच उद्योग शरद पवार व त्यांच्या साथीदारांनी केला. त्यामुळेच जनतेने त्यांना पंचायत ते पार्लमेंट सर्वत्र पराभूत केले. जनतेमधील पाठिंबा संपुष्टात आला आणि विश्वासार्हता उरली नसल्याने आता शरद पवार शेतकऱ्यांना भडकावून पुन्हा राजकीय महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायला सांगून त्यांचा आंदोलनात बळी द्यायचा व तापलेल्या वातावरणात स्वतःचे राजकारण साधायचे, हा शरद पवार यांचा डाव घातक असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या राजकीय डावाला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.