विंग कमांडर अभिनंदनची सूरतगड एअर फोर्सच्या तळावर नियुक्ती

0

सूरतगड: पुलवामा हल्ल्यानंतरचर्चेत असलेले पाकिस्तानचे F-16 फायटर विमान पाडणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची राजस्थानमधील सूरतगडच्या एअर फोर्स तळावर नियुक्ती करण्यात आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. बालाकोट एअरस्ट्राइकनंतर २७ फेब्रुवारीच्या सकाळी काश्मीरमध्ये झालेल्या डॉगफाइटमध्ये अभिनंदन यांनी पाकचे F-16 पाडले. त्याचवेळी त्यांचे मिग-२१ बायसनही कोसळले. अभिनंदन पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. ६० तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. या घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

अभिनंदन शनिवारी सूरतगड एअर फोर्स तळावर रुजू झाले. यापूर्वी ते बिकानेरमध्येही तैनात होते. अभिनंदन यांचे वडिलही हवाई दलात होते. वडिलांची पोस्टिंग राजस्थानमध्ये असताना अभिनंदन यांनी त्यांचे शिक्षण राजस्थानमध्ये घेतले आहे. हवाई दलाच्या वैमानिकांच्या पोस्टिंगचा विषय गोपनीय असतो. फक्त आम्ही विंग कमांडर अभिनंदन यांची राजस्थानध्ये पोस्टिंग झाली आहे एवढेच सांगू शकतो. त्या व्यतिरिक्त काहीही सांगता येणार नाही असे हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सूरतगडमध्ये मिग-२१ बायसनचा बेस आहे.

अभिनंदन कॉकपीटमध्ये परतणार की, नाही ते अजून स्पष्ट झालेले नाही. विंग कमांडर यांच्या प्रकरणाकडे थो़डया वेगळया अंगाने पाहिले जाऊ शकते असे टाइम्स ऑफ इंडियाने सूरतगडमधील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. पाकिस्तानातून परतल्यानंतर अभिनंदन यांची ही पहिली पोस्टिंग आहे. मागच्याच आठडयात विंग कमांडर अभिनंदन यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. आपल्या आधीच्या काश्मीरमधल्या तळावरील सहकाऱ्यांचे आभार मानताना त्यांच्यासोबत सेल्फी घेतानाचा हा व्हिडिओ होता.