नवी दिल्ली: एअर इंडियाच्या ‘चेक इन’ सॉफ्टवेअरमध्ये शनिवारी झालेल्या बिघाडाचा फटका आजही विमान उड्डाणांना बसत आहे. आज रविवारी एअर इंडियाची १३७ उड्डाणे उशीरा झाली. हा सरासरी विलंब १९७ मिनिटांचा असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.
एअर इंडियाचे पॅसेंजर सर्व्हिस सिस्टीम हे सॉफ्टवेअर प्रवाशांचे चेक इन, बॅगेज आणि रिझर्व्हेशन आदि सेवांचे नियोजन करतं. शनिवारी पहाटे ३.३० ते ८.४५ वाजेपर्यंत या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. परिणामी कंपनीच्या जगभरातल्या उड्डाणांवर परिणाम झाला आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या बिघाडाचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या उड्डाणांवरही झाला आहे. शनिवारी १४९ उड्डाणे विलंबाने होती तर रविवारी १३७ विमाने उशिराने उड्डाण करणार आहेत.