मुंबई- बॉलिवूड सिंघम अजय देवगण लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगण व दिग्दर्शक प्रकाश झा यांची जोडी ५ वर्षांनंतर एकत्र येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार असून दिग्दर्शक प्रकाश झा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. चित्रपटाची कथा नेमकी कोणत्या मुद्द्यावर आधारित असणार आणि चित्रपटाचे शीर्षक या गोष्टी अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘दिल क्या करे’ या चित्रपटात अजयने पहिल्यांदा प्रकाश झा यांच्यासोबत काम केले होते. म्हणजेच हा चित्रपट या जोडीचा पहिला चित्रपट होता, १९९९ मध्ये आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. यानंतर ‘गंगाजल’, ‘अपहरण’,‘राजनीती’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. २०१३ साली आलेल्या ‘सत्याग्रह’मधून अजय देवगण व प्रकाश झा यांची जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर परतली. ‘सत्याग्रह’ या चित्रपटानंतर ५ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याने प्रेक्षकांचीही या चित्रपटासाठीची उत्सुकता वाढली आहे.
सध्यातरी अजय देवगण आपल्या ‘तानाजी’ या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात सलमान खानही विशेष भूमिकेत असणार असल्याचे बोलले जात आहे. २९ नोव्हेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.