अ.भा.म.चित्रपट महामंडळ फेरमतमोजणीत अभिनेता सुशांत शेलार विजयी

0

पुणे-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या फेरमतमोजणी आज सोमवारी झाली असता अभिनेता गटात सुशांत शेलार विजयी झाले. त्यांनी माजी अध्यक्ष विजय पाटकर यांचा १६ मतांनी पराभव केला. या विजयामुळे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनेलचे १४ पैकी १३ संचालक झाले आहेत.

सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजे भोसले, सतीश रणदिवे यांच्या समर्थ पॅनेलने १४ पैकी १२ जागांवर विजय मिळवला होता. विजय पाटकर, सतीश बिडकर या क्रियाशील पॅनेलच्या दोन उमेदवारांनी विजय खेचून आणला होता.

तत्कालीन अध्यक्ष विजय पाटकर यांच्या अभिनेता गटातून विजयी होण्याला सुशांत शेलार यांनी धर्मादाय कार्यालयाकडे हरकत घेतली होती, पण ती फेटाळण्यात आली होती. त्यावर शेलार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने आज फेरमोजणी झाली, यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह बहुतांशी संचालक उपस्थित होते.

नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले शेलार यांना ५९१ तर पाटकर ५७५ मते मिळाली. या यशाबद्दल बोलताना सुशांत शेलार म्हणाले, गेल्या अडीच वर्षाची लढाई आज संपली. माझी शंका अखेर खरी ठरली. या कामातून आनंद साजरा करणार आहे. तर, दुसरीकडे पाटकर म्हणाले, फेरमतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक झाली आहे त्यामुळे हा निर्णय मला मान्य आहे.