अलकायदाच्या दहशतवाद्यास अटक; झारखंड एटीएसला मोठे यश !

0

रांची: जिहादच्या नावाखाली दहशतवादी कारवायांसाठी कार्यरत असलेल्या व तीन वर्षांपासून पोलिसांना हवा असलेल्या अलकायदाच्या दहशतवाद्यास अटक करण्यात झारखंड पोलीसांच्या एटीएस पथकास मोठे यश आले आहे. मोहम्मद कलीमुद्दीन असे या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचे नाव आहे. जमशेदपूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होते.

कलीमुद्दीन अलकायदाचा मोस्ट वाँटेड दहशतवादी होता. त्याला टाटानगर रेल्वे स्थानक येथून अटक करण्यात आली आहे. तो भारतीय उपखंडातील तरूणांना जिहादसाठी प्ररित तसेत दहशतवादी करावायांसाठी तयार करायचा. याशिवाय तो नव्याने भरती करण्यात आलेल्या तरुणांना दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला देखील पाठवत असे. जमशेदपूर येथील रहिवासी असेलला कलीमुद्दीन तीन वर्षांपासून फरार होता. त्याचे साथीदार मोहम्मद अब्दुल रहमन अली उर्फ हैदर उर्फ कतकी, अब्दुल सामी उर्फ उज्जन उर्फ हसन हे दिल्लीतील तिहार तरूंगात कैद आहेत. कलीमुद्दीन तरूणांना भरती करण्यासाठी उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगालबरोबरच अन्य राज्यांमध्येही सक्रीय होता. याशिवाय बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, सौदी अरबसह अन्य देशांमध्येही तो यासाठी गेलेला आहे.