मुंबई: कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून आज पुन्हा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारले आहे. सकाळपासून संपाला सुरुवात झाले आहे मार्ड, परिचारिका संघटना, रेडिओलॉजी असोसिएशन यांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे. सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर संपकाळात काळ्या फिती लावून काम करणार आहेत. मात्र, खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर या संपात सहभागी होणार असल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.
‘आयएमए’च्या घोषणेनुसार, सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा असे २४ तास ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. त्यामुळं उपचारासाठी नव्यानं रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होणार आहेत. महाराष्ट्रातील हजारो डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. डॉक्टरांवर सातत्याने होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करण्यासह डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी ‘आयएमए’चे माजी सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी केली आहे.