नवी दिल्ली: प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. सरकारकडून प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अद्यापही याचा वापर कमी होताना दिसत नाही. दरम्यान आता २ ऑक्टोंबरपासून देशात प्लास्टिक पूर्णत: बंदी घालण्यात येणार आहे. केंद्राने प्लास्टिक बंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला आहे. ग्राहक आणि दुकानदारही काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्यावर भर देऊ लागले आहेत.
प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंचे उत्पादन २ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंद करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. त्याबाबत केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना दिली आहे. याबाबत पर्यावरण मंत्रालयानंही या महिन्याच्या सुरुवातीला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या वस्तू उदा. कृत्रिम फुले, बॅनर, फ्लॅग, फुलदाणी, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक स्टेशनरी साहित्य आदींचा वापर करू नये, असे म्हटले होते.