मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायचे आज सोमवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी आगमन होत आहे. सकाळपासून बाप्पाला विराजमान करण्यासाठी भक्तगण व्यस्त आहेत. श्रींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्ताने अवघा महाराष्ट्र भक्तिरसात चिंब झाला असून पुढील दहा दिवस हा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
सकाळपासूनच बाप्पाला घेऊन जाण्यासाठी रांगा लागल्या होत्या. सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे. बाप्पाची मूर्ती हातात येताच ‘मोरया’चा गजर टीपेला पोहोचत होता. कुणी पाटावरून, कुणी डोक्यावरून, कुणी दुचाकीवर, कुणी रिक्षाने तर कुणी स्वत:च्या खासगी वाहनांनी बाप्पांना घरी आणले. कुटुंबातील काही सदस्य बाप्पांना आणण्यासाठी घराबाहेर पडले असताना इकडे घरात वडीलधाऱ्यांची सजावटीची लगबग सुरू होती. प्राणप्रतिष्ठेसाठी गुरुजींची धावपळ सुरू होती. काही छोट्या सार्वजनिक मंडळांनीही आज बाप्पाची प्रतिष्ठापना केली. त्यामुळं गल्लोगल्ली जल्लोष पाहायला मिळाला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सिद्धिविनायक येथे जाऊन गणरायाची पूजा केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी देखील विधिवत पूजा करून बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.