मुंबई: कोलकात्यात एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टराणी आज संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र या संघटनांकडून आज राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग, अन्य विभाग आणि शैक्षणिक दिनक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यादरम्यान राज्यातील रुग्णालयांतील आपत्कालीन रुग्णसेवा सुरू असेल.
कोलकात्यातील मारहाणीचा महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रलमार्ड आणि इंटर्न डॉक्टरांची संघटना अस्मी यांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच, डॉक्टरांना सतत होणाऱ्या मारहणीच्या निषेधात न्याय देण्यासाठी एकत्र उभे राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध पत्रक काढले आहे.शासनाकडून आरोग्य योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. पण, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी राज्यात सुरू असलेली निदर्शन ही राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा डाव असून आपण त्याचा निषेध करते. डॉक्टरांनी पुकारलेला संप हा माकप आणि भाजपाचा कट आहे असे म्हटले आहे. माकपच्या सहकार्याने भाजप हिंदी-मुस्लीम राजकारण करत आहे. त्यांचे हे प्रेम पाहून आपल्याला धक्का बसला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जातीय तणाव निर्माण करण्यास खतपाणी घालत आहेत आणि फेसबुकवर अपप्रचार करत आहेत, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सरकार गंभीर असून डॉक्टरांनी केवळ प्रतीकात्मक आंदोलन करून आपले कार्य बजावत राहावे असे आवाहन केले आहे.