नवी दिल्ली-केंद्राने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत राफेल लढाऊ विमान कराराप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालातील परिच्छेदात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या परिच्छेदात नियंत्रक आणि महालेखा परिक्षक (कॅग) अहवाल आणि संसदेच्या पीएसीबाबतचा संदर्भ आहे. यावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. एका शब्दाची चूक समजू शकतो. पण इथे तर संपूर्ण परिच्छेदमध्येच गडबड आहे. संपूर्ण परिच्छेदात चूक होऊ शकत नाही, असे खर्गे म्हणाले. खर्गे हे लोकलेखा समितीचे (पीएसी) अध्यक्ष ही आहेत.
राफेल प्रकरणी टायपिंगची चूक सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राफेल व्यवहाराबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत संशय घेणे ठीक नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले होते. या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजयकिशन कौल आणि न्या. के एम जोसेफ यांचा समावेश होता.
आम्हाला राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी हवी. जेव्हा संसदेचे सदस्य या विषयीच्या फाईल पाहतील, तेव्हाच याबाबतचे संपूर्ण सत्य समोर येईल, असे ते म्हणाले. तसेच बोफोर्स आणि २ जी प्रकरणातही जेपीसी गठीत करण्यात आली होती, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
ते म्हणाले, राफेलप्रकरणी सरकारच्या अहवालात टायपिंगची चूक कशी होऊ शकते ? जर ही चूक एका शब्दाची असती तर ठीक होते. पण संपूर्ण परिच्छेदमध्ये चूक कशी असू शकते, असा सवाल त्यांनी केला.