आगामी सर्व निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढेल

0

गोंदिया: भंडारा – गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसह आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत आघाडी करण्याची चर्चा झाली, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. ते गोंदियात बोलत होते.

यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, “सध्या भंडारा – गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. काही वेळापूर्वी दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत याबाबतचा निर्णय झाला. केवळ हीच निवडणूक नव्हे तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढावं, अशी चर्चा झाली”

गेल्यावेळी भंडारा – गोंदियाची जागा राष्ट्रवादीने तर पालघरची जागा काँग्रेसने लढवली, त्या जागा तशाच राहतील, असा निर्णय दोन्ही पक्षाचा झाला आहे, असं पटेल यांनी सांगितलं. भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. येत्या 9 तारखेला उमेदवार घोषित करु, असं प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं. इतकंच नाही तर खासदारकीचा राजीनामा देत, भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते माझे लहान भाऊ आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.