दुष्ट प्रवृत्तींचा बिमोड करणे म्हणजे देशाशी मैत्री-प्रा.होले

0

भुसावळ: चुकीच्या गोष्टींना विरोध, दूष्टप्रवृत्तींचा बिमोड करणे, भ्रष्टाचारासह अनितीला आळा घालणे म्हणजे देशाशी मैत्री करणे होय, असे परखड मत सावद्याचे कथाकथनकार प्रा.व.पु.होले यांनी येथे केले. भुसावळच्या जय गणेश फाउंडेशन संचलित जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघातर्फे शनिवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘मैत्री देशाशी’ या विषयावर सुरभीनगरातील नवसाचा गणपती मंदिरात त्यांनी हे विचारपुष्प गुंफले. संघाचे अध्यक्ष विलास चौधरी यांंनी शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. कुठेही भ्रष्टाचार होत असेल तर त्याला आळा घालणे, चुकीच्या गोष्टींना विरोध करणे, दूष्टप्रवृत्तींच्या विरोधात लढणार्‍यांना बळ देणे, अनुचित प्रकार रोखणे म्हणजेच देशाशी मैत्री करणे होय. प्रखर राष्ट्रभक्ती काय असते हे अनुभवायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे वर्णन वाचा. स्वामीनिष्ठा म्हणजे काय? याचे उत्तर शोधायचे असेल तर शिवाजी महाराजांचा ‘मावळा शिवा काशीद’ हे व्यक्तीमत्त्व डोळ्यासमोर ठेवा, असा सल्लाही प्रा. होले यांनी दिला.

यांची विचारमंचावर उपस्थिती

उपाध्यक्ष वसंत चौधरी, सहसचिव लोटन चौधरी, समन्वयक अरुण मांडळकर, कोषाध्यक्ष शांताराम बोबडे, पदसिद्ध सदस्य दिनकर जावळे, विलास बेंद्रेे, सुलोचना वारके, ऑडिटर सुरेश पाटील, एम. यु. पाटील, मंगला वाणी यांची विचारमंचावर उपस्थिती होती. ज्येष्ठांना सेवाकार्याची ऊर्जा मिळावी म्हणून संघातर्फे प्रत्येक आठवड्याला सामाजिक, शैक्षणिक विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद हा उत्साह वाढवणारा आहे, अशी भावना समन्वयक अरुण मांडळकर यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केली. आभार सुरेश पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी पदाधिकारी व सदस्यांनी परीश्रम घेतले.
देशाला बाह्यशक्तींचा धोका कमी आहे मात्र देशातील नवी पिढी विचाराने कमकुवत होत असल्याची भीती आहे. आपल्या देशात कुशाग्र बुद्धीमत्तेचे तरूण आहेत. पण ते आयटीचा उगमस्त्रोत असलेल्या देशांकडे नोकरीसाठी धाव घेताहेत मात्र हे चित्र बदलले पाहिजे. संकट काळात एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाणे म्हणजे ही सुद्धा राष्ट्रभक्तीच आहे. सुरक्षिततेसाठी देशाशी मैत्री करा, असे प्रा. होले म्हणाले.