पाच लाखाच्या मालवाहू गाडीसह पोलिसांनी अवैधरित्या वाहतूक होत असलेला 20 लाख 70 हजाराचा विमल गुटखा असा 25 लाख 70 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर प्रतिनिधी

गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र असलेल्या मुक्ताईनगरात येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा बंदी असलेला लाखोंचा गुटखा असलेली मालवाहू गाडी 22 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता शहरातील संत मुक्ताबाई महाविद्यालयासमोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. सर्रास गुटखा मध्य प्रदेशातून आणला जात असल्याचे पुन्हा निष्पन्न झालेले आहे . चेक पोस्ट नाक्यावरून ह्या गाड्या पास होतातच कशा असा प्रश्न असून सर्व काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून होत असल्याचे समजते. पाच लाखाच्या मालवाहू गाडीसह पोलिसांनी अवैधरित्या वाहतूक होत असलेला 20 लाख 70 हजाराचा विमल गुटखा असा 25 लाख 70 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मध्य प्रदेशातून मुक्ताईनगर तालुक्यात अवैधरीत्या गुटखा वाहतुक करणारी गाडी येत असल्याची गुप्त माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांना मिळाली होती. पोलिस ठोस कारवाई करीत नसल्याने आमदार पाटील यांनी स्वतः गुटख्याची मालवाहू गाडी क्रमांक क्रमांक- एम. एच. १९ सीवाय ९२८७ अडवून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिली.

पोलीस कॉस्टेबल दिगंबर कोळी यांच्या फिर्यादीवरून भरत सुदाम बाविस्कर गाडीचा चालक दिनकर नगर जळगाव, साठ्याचा मालक विकास सोनवणे राहणार पाळधी तालुका धरणगाव व शहापूर जिल्हा बऱ्हाणपूर येथील माल विक्री करणारा मालक यांचे विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गाडीमधून 20 लाख 70 हजाराचा केशर युक्त विमल गुटखा तसेच पाच लाख रुपये किमतीची अशोक लेलँड कंपनीची मालवाहू गाडी क्रमांक एम एच 19 सी वाय 92 87 असा एकूण 25 लाख 70 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. पोलीस निरीक्षक शंकर इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे तपास करीत आहे.

महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना गुटख्याची तस्करी पूर्णतः थांबलेली नाही. गुटख्याच्या होलसेल व्यापाऱ्यांशी पोलिसांनी आर्थिक हितसंबंध निर्माण केल्याने तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. उलट गुटखा तस्करांची पाठराखण केली जात असल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे व विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी सभागृहामध्ये अवैध गुटख्याच्या संदर्भात आवाज उठवला होता. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष देत जिल्ह्यातील गुटख्याच्या घाऊक विक्रेत्यांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

चौकट……. मुक्ताईनगर तालुका हे अवैध धंद्यांचे माहेरघराचे केंद्र बनले आहे. अवैधरित्या गुटख्याची तस्करी, मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर मधील एका भागातून तांदुळाची तस्करी, रात्रीच्या वेळी होत असलेली अवैध वाळू (रेती) वाहतूक , अवैध दारू विक्री मटका सट्टा पत्ता जुगार, प्रवर्तन चौकाजवळच एका ठिकाणावरून पन्नीची दारू विक्री होत असल्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून सदरील प्रकार सुरू असल्याच्या चर्चा असून याकडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.