शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास
अमळनेर ः अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेच्या अर्जापोटी विद्यार्थीनींकडून अव्वाच्यासव्वा रक्कम उकळणार्या खान्देश शिक्षण मंडळ संचलित डी.आर. कन्या शाळेच्या प्रशासनाचे एकामागून एक पितळ आता उघड पडत फास अधिकच घट्ट आवळला जात आहे. आर्थिक शोषणासह मुलींचे शैक्षणिक नुकसानही केले जात असल्याचे धक्कादायक प्रकार शिक्षण विभागामार्फत करण्यात येत असलेल्या सहा सदस्यीय चौकशी समितीच्या निदर्शनास विद्यार्थीनींनी आणून दिले.
शिक्षण विभागामार्फत सहा सदस्यीय समिती चौकशीसाठी शाळेत दाखल झाल्याचा निरोप मिळताच खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, उपकार्याध्यक्ष जितेंद्र जैन, संचालक निरज अग्रवाल, योगेश मुंदडा व चेअरमन डॉ.बी.एस. पाटील हेही दाखल झाले. विद्यार्थीनींनी कोणतीही भिती न बाळगता दुपार सत्रानंतर आमच्या तासिकाच होत नाहीत, परीक्षा जवळ आलेली असताना गणित विषयाचे एकच चॅप्टर झाले आहे, पैसे घेतलेले असताना मात्र गेल्या तीन वर्षांपासून ओळखपत्रच दिलेले नाही, विकास निधी च्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थीनीकडून ४०० रूपये उकळण्यात येतात अशा अनेक बाबी यावेळी समोर आल्या. विशेष बाब म्हणजे, या लुटीत महत्वाच्या म्होरक्याची पाठराखण करणार्यांनी शाळेने विद्यार्थीभिमुख व्हावे, आर्थिक लूट करू नये, योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे द्यावा यासाठी आवाज उठविणार्या शिक्षकावर मात्र बदलीचा बडगा उगारण्यात आला होता. त्या शिक्षकाचा दादपुकारा संचालक मंडळ, चेअरमन व शिक्षक प्रतिनिधी यांनी सुद्धा घेतला नाही.
मंत्र्यांकडे तक्रारीनंतर चौकशी समिती
दरम्यान, मंत्री महादेव जानकर प्रणित राष्ट्रीय समाज पक्षाने हा विषय गांभीर्याने घेत युवती जिल्हाध्यक्ष प्रा.ज्योती भोई आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याप्रकरणी चौकशी होऊन कारवाईची मागणी शिक्षण विभागासह विविध जबाबदार अधिकारी व मुख्याध्यापकांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागामार्फत चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण या होत्या. तर गटशिक्षण अधिकारी राजेंद्र महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. धनगर, बी.जी. चौधरी, बी.डी. धाडी, गणेश शिवदे या सदस्यांचा समावेश होता. चौकशीनंतर समिती आपला वस्तुनिष्ठ अहवाल शिक्षणाधिकारी यांना पाठविणार आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी पुढील काय कार्यवाही करायची ते ठरविणार आहेत. दरम्यान विद्यार्थीनींनी शाळेतील एकेका प्रकरणाची पोलखोल करत भिंग फोडल्याने खान्देश शिक्षण मंडळाच्या अन्य शाखांमध्ये व शहरातील इतर शाळांमध्ये असले काही प्रकार सुरू नाहीत ना? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.