वीर पत्नी सुषमा राजपूत यांचा साडी देऊन सन्मान
अमळनेर : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ‘एक शाम वीर जवानो के नाम’ असा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमात पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेले मलकापूरचे रहिवासी वीर संजयसिंग राजपूत यांच्या पत्नीसह पूर्ण कुटुंबाचा सत्कार आणि सन्मान भरत पवार, भटेश्वर वाणी, सचिन चव्हाण, जितेंद्र पाटील, गौतम बिर्हाडे, चंद्रकांत काटे, उमेश धनराळे, जयश्री साळुंखे यांनी साडी चोळी आणि आर्थिक मदत देऊन केला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला तेजाचे प्रतीक म्हणून एक छोटीशी पणती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, माजी आमदार साहेबराव पाटील होते. कार्यक्रमात सदाबहार अशा देशभक्तीपर गीतांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. यात सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तर याच ठिकाणी माजी सैनिकांना राखी बांधून ओवळण्यात आले.
आमदार वाघ यांच्यातर्फे आर्थिक मदत
कार्यक्रमात पुण्याचे माजी पोलीस आयुक्त साहेबराव पाटील, युवा नेता भिकेश पाटील यांनीही भेट दिली. कार्यक्रमात या कुटुंबाला अमळनेर राजपूत समाज,विधानपरिषदेचे आमदार स्मिता वाघ यांच्या तर्फे आर्थिक मदत करण्यात आली. तर याच ठिकाणी मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्याद्वारे संकलित झालेले आर्थिक योगदानाची बंद पेटी त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमात सुरू असलेल्या देशभक्तीपर गीतांवर शहीद राजपूत कुटुंबाला अश्रू अनावर झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डिगंबर महाले यांनी केले.