आमदार शिरीष चौधरी यांची माहिती
अमळनेर: अमळनेर मध्ये ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास ४जुन रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयान्वये मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यानीं दिली. या रुग्णालयामुळे शहरात अनेक तज्ञ डॉक्टरांची संख्या वाढून सोयी सुविधा देखील वाढीस लागणार आहे. या बाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी अमळनेर येथे ३० खाटावरून ५० खाटांचे श्रेणीवर्धन आणि अमळनेर विधानसभा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसोदे ता. पारोळा येथे 30 खाटाचें ग्रामिण रुग्णालय मंजूर करण्याबाबत आश्वासन देऊन तो प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचा खुलासा केला होता.
रुग्णांना होणार फायदा
या संदर्भात आ.चौधरी यांनी सुरवातीला डिसेंबर २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या बाबत माहिती दिली होती. अमळनेर विधानसभा मतदार संघाची लोकसंख्या जवळ जवळ ३ लाख ६०हजार इतकी असून मतदार संघालगत शिंदखेडा, पारोळा, धरणगाव व चोपडा या तालूक्यातील गावे जुळलेली आहेत. सद्यस्थितीत अमळनेर येथे 30 खाटाचें रुग्णालय असून येथे पुरेश्या सुविधा उपलब्ध होत नाहीत.
२०१६मध्ये केली होती शिफारस
आ. चौधरी यांनी आरोग्य सेवा संचालनायात सतत पाठपुरावा केला होता. मुंबई येथील आरोग्य सेवेचे सहसंचालक डॉ. एस.के. जाधव यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रधान सचिवांना एप्रिल २०१६ मध्ये अमळनेर येथे रुग्णालयास मंजुरी मिळावी अशी शिफारस केली होती. शिफारस केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आला होता. आता शासनाने मंजुरीचा निर्णय दिल्याने रुग्णालय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुविधा: या रुग्णालयात डॉक्टरांची संख्या १२ ते १५ वाढून त्यात शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, बालरोग, हृदयरोग, दंतरोग, अश्या प्रत्येक विभागाचे स्वतंत्र डॉक्टर उपलब्ध असतील. परीचारिकांची संख्या वाढून प्रत्येक विभागास स्वतंत्र परिचारिका व वॉर्डबॉय असतील. एकंदरीत रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तिपटीने वाढणार आहे. रूग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधा व आधुनिक यंत्रसामुग्री वाढून रुग्णांना पुढील उपचारासाठी धुळे व जळगाव या ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही. अशी माहिती अमळनेर ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताळे यांनी दिली. या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या वरील मजल्यावर बांधकाम वाढवून सर्व सुविधांयुक्त प्रशस्त इमारत उभी होईल. जर शासनाने ढेकू रोडवरील बांधकाम विभागाजवळील रुग्णालयाच्या आरक्षित जागेत रुग्णालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी भव्य रुग्णालय उभे राहिल. आहे त्या जागेवरच बांधकाम केले जाणार आहे. बांधकामासाठी सहा कोटी खर्चाचे अंदाज पत्रक असले तरी चालू डिएसआर रेट नुसार हा बजेट वाढणार आहे. मात्र हे अद्ययावत रुग्णालय अमळनेर मतदारसंघासाठी वरदानच ठरणार आहे.