आमदार शिरीष चौधरींच्या पुढाकारामुळे गरजूंना न्याय
अमळनेर- सर्वसामान्य जनतेबाबत लोकप्रतिनिधीला खरंच कळवळा असला तर तो काय करिष्मा करू शकतो याचा प्रत्यय आ शिरीष चौधरी यांच्याकडून आला असून त्यांनी निराधार योजनेची तब्बल २७८६ प्रकरणे एकाच बैठकीत जागेवर मंजूर करून आर्थिक पिडीत लाभार्थ्यांना असलेल्यांना सुखद असा धक्का दिला. खरेतर यानिमित्ताने प्रथमच गतिमान प्रशासनाचा अनुभव देखील लाभार्थ्यांना आला.
संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांची बैठक आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत प्राप्त झालेली सर्व प्रकरणे येथेच मंजूर झाली पाहिजेत अशा सूचना आ चौधरी यांच्या असल्याने त्यादृष्टीने प्रशासन देखील सज्ज झाले होत. बैठकीत संजय गांधी योजना ३४०, श्रावण बाळ योजना २०२२, इंदिरा गांधी योजना ४२४ असे एकूण २७८६ प्रकरणे मंजूर करण्यात आलित, विशेष म्हणजे प्राप्त झालेली काही प्रकरण अपूर्ण असतील किंवा त्रुटी असतील त्या जागेवरच पूर्ण करून मंजूर करण्यात आले. बैठकीत आमदार शिरीष चौधरींसह तहसीलदार ज्योती देवरे व संबंधित अधिकारी तसेच समितीचे सदस्य देखील उपस्थित होते.
निराधारांना दिलासा
निराधार योजनेची प्रकरणे मंजूर करण्यासाठी अनेक जण दलालांच्या कचाट्यात येत होते. यामुळे अनेकाना आर्थिक भुर्दंड देखील बसत होता. काहींची फसवणूक होण्याचे प्रकार देखील घडत होते,सर्वसामान्यांची ही लूट थांबविण्यासाठी आमदार चौधरी यांनी ही बैठक लावून संबधित लाभार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना केल्या असल्याने अर्ज सादर करणारे सर्व लाभार्थी आवर्जून उपस्थित राहिले आणि आमदारांनी देखील त्यांच्या समक्ष सर्व प्रकरणे मंजूर करून आपण खरे लोकसेवक असल्याचा प्रत्यय जनतेला दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणात निराधार योजनेची प्रकरणे एकाच बैठकीत पहिल्यांदाच मंजूर होत असून यामुळे आमदार चौधरींचे विशेष कौतुक होत आहे.