पाडळसरे धरणास निधीचे आश्वासन १०० टक्के पूर्ण होणार

0

भाजयुमोचे अमळनेर तालुकाध्यक्ष भिकेश पाटील यांचा विश्वास

अमळनेर(प्रतिनिधी) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण भारत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उदो उदो होऊन रेकॉर्डब्रेक जागा निवडून आल्या असताना जळगाव मतदार संघातील भाजपा मित्रपक्षाचे उमेदवार खा. उन्मेषदादा पाटील हे देखील राज्यात टॉपच्या मताधिक्याने विजयी झालेत,एवढेच नव्हे तर अमळनेर मतदार संघातील जनतेने देखील तब्बल ६० हजारांचे मताधिक्य त्यांना दिले. पाडळसरे धरणाच्या पुर्णत्वाने या मताधिक्क्याची परतफेड केली जाईल अशी माहिती युवा नेते तथा भाजयुमोचे तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे सदस्य भिकेश पाटील यांनी दिली.
अमळनेर मतदार संघात खा. उन्मेष पाटील यांच्या प्रचाराची धुरा प्रमुख पदाधिकार्‍यांसोबत यशस्वीपणे सांभाळणारे भिकेश पाटील यांनी निकालानंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की जनतेने दिलेल्या या मताधिक्याची परतफेड निश्चितपणे अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाडळसरे धरणाच्या पूर्णत्वाने होईल हा विश्वास असून तशी ग्वाही देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमळनेर येथे जाहीर सभेत देऊन जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हेच हा प्रश्न सोडवतील असे सांगितले आहे. तसेच धरणाव्यतिरिक्त शहर व ग्रामिण भागात अनेक महत्वाचे व ज्वलंत प्रश्न असून त्याकडे देखील आम्ही खासदारांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमळनेरातुन भाजपाचाच आमदार निवडून देणार
उन्मेष पाटलांच्या विजयी गणिताबाबत बोलताना ते म्हणाले की सुरवातीपासून जळगाव लोकसभेत भाजपाचा उमेदवार कुणीही असो मोदीजी व भाजपाला भक्कम पाठबळ देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मतदार संघाचा खासदार निवडलाच पाहिजे या मानसिकतेत आम्ही होतो. उमेदवारीत पक्ष स्तरावर काही बदल देखील झालेत. मात्र अंतिम क्षणी उन्मेष पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर आम्ही कामाला लागलो. मतदानास अवघे १९ दिवस शिल्लक असताना सुक्ष्म नियोजनाकडे आम्ही भर दिला. यात प्रामुख्याने ना गिरीश महाजन व काही वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. आमची युवा टीम यंदा विशेष सक्रिय होती. आता अशीच ताकद आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवून पंतप्रधान मोदींजी,मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री ना महाजन यांच्या नेतृत्वात या मतदार संघातून कोणत्याही परिस्थितीत भाजपाचाच आमदार देखील निवडून देऊ असा विश्वास भिकेश पाटील यांनी व्यक्त केला.