व्यावसायिकांमध्ये उडाली खळबळ : पाच हजाराचा दंड
अमळनेर : प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी अमळनेर नगरपालिकाच्या आरोग्य विभागाने कारवाई करून न्यानेश प्लास्टिक फर्म येथून तब्बल २२ किलो प्लास्टिक जप्त केले. यात प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या डिश, चमचे, प्लास्टिकचे ग्लास आढळून आले. तसेच त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना अमळनेर नगरपालिकेच्या प्रामुख्याने दुकानांना लक्ष्य केले. जिथे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल आणि तत्सम साहित्य आढळले, त्याठिकाणी तपासणी करून कारवाई करण्यात आली. प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या डिश, चमचे यांची विक्री करणार्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात झाली असून, ही कारवाई कायम राहणार आहे, असे अमळनेर नगरपालिकाच्या अधिकार्यांनी सांगितले.
प्लास्टिकचा वापर करणार्यांना समज
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्या सर्वसामान्यांना नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडुन समज देण्यात आली आहे. यापुढील काळातही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पालिकेतील अधिकार्यांनी सांगितले. राज्य सरकारने यापूर्वीच प्लास्टिकबंदी लागू केली होती. या काळात सरकार आणि नगरपालिकेतर्फे जनजागृती करण्यात आली. शासनाने राज्यात घनकचरा व्यवस्थापन नियमान्वये प्लास्टिक बंदी केलेली असून त्यानियमान्वये अमळनेर शहरात देखील प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या आदेशान्वये प्रशासन अधिकारी संदीप गायकवाड, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिर्हाडे , प्रभारी निरीक्षक अरविंद कदम तसेच शहर समन्वयक गणेश गढरी, कर्मचारी विजय सपकाळे, फय्याज शेख, व समाधान बच्छाव यांनी ५ हजार रु. दंडाची कारवाई केली.