संत सखाराम महाराज व्दिशताब्दी सोहळ्यास आजपासून प्रारंभ

0

अमळनेर नगरी कार्यक्रमासाठी सज्ज, विविध कार्यक्रमाचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर येथील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज व्दिशताब्दि सोहळा कार्यक्रमास २१ एप्रिल २०१९ पासून मोठा उत्साहात आरंभ होत आहे. न भूतो न भविष्यती अशा सोहळ्याचे नियोजन पूर्ण झालेले असून अमळनेर नगरी या अभूतपूर्व सोहळ्यासाठी सज्ज झालेली आहे. संत सखाराम महाराजांचा महाराष्ट्रातील काना कोपर्‍यातून शिष्यगण, तसेच वारकरी आणि त्यांचे अनुयायी असा मोठा गोतावळा अमळनेरला दाखल झाला आहे. आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे औपचारिक उद्घाटन प्रसाद महाराज यांनी फीत सोडून केले.
बोरी नदीच्या वाळवंटात संत सखाराम महाराज यांनी वैष्णव भक्तीचा मळा फुलविला. त्या आद्य पुरूष सद्गुरू संत सखाराम महाराज यांचे हे २०० वे समाधी वर्ष आहे. या औचित्याने अमळनेरच्या संत सखाराम महाराज व्दिशताब्दी सोहळ्याचे भव्य असे नियोजन करण्यात आलेले आहे. संस्थानचे विद्यमान गादीपती श्री. संत प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाने अहोरात्र काम करून भव्य असा सभामंडप उभारलेला आहे. २१ ते २९ एप्रिल दरम्यान विविध नियोजित कार्यक्रम त्या त्या मंडपात होणार आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याचे आपणासही साक्षीदार होता यावे यासाठी महाराष्ट्रभरातून अमळनेर नगरीत हजारों भाविक, वारकरींचे आगमन झालेले आहे.

असे होणार विविध कार्यक्रम
२१ ते २९ एप्रिल या काळात होणार्‍या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन भुपाळी, सकाळी ६ ते ७ संत सखाराम महाराज समाधी अभिषेक, ७ ते दुपारी १ श्री महाविष्णू पंचायतन याग-पुजन-हवन, १ ते ३ महाप्रसाद, साडे तीन ते साडेचार दरम्यान अभ्यागत सतांचे पहिल्या सत्राचे प्रवचन यामध्ये , दि. २२ रोजी समर्थभक्त भूषणस्वामी महाराज सज्जनगड, २३ रोजी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले सातारा, दि.२४ वेदमूर्ति घनपाठी शांतारामजी भानोसे नाशिक, दि. २५ हभप जयंतमहाराज बोधले पंढरपूर, २६ रोजी हभप गुरूबाबा महाराज औसेकर, आणि २८ रोजी हभप दादा महाराज जोशी यांचे संत सखाराम महाराज चरित्र साडेतीन ते सहा दरम्यान होईल. प्रवचनाच्या दुसर्‍या भागात सायंकाळी पाच ते साडेसहा दरम्यान अनुक्रमे हभप शंकरमहाराज बडवे, श्रद्धेय दत्तभक्त बाबा महाराज तराणेकर, हभप ज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्ये, हभप माधवदास महाराज तपोवन, हभप बाळासाहेब देहूकर, हभप योगीराज महाराज गोसावी, हभप दादा महाराज जोशी यांचे प्रवचन होईल. २२ ते २९ एप्रिल दरम्यान दररोज रात्री ८ ते १० दरम्यान हरिकीर्तन होईल त्यात अनुक्रमे हभप ज्ञानेश्वर महाराज नामदास, पंढरपूर, हभप दादा मराराज शिरवळकर पंढरपूर, हभप अमृतानंद महाराज जोशी बीड, हभप संदीपान महाराज शिंदे हांसेगावकर, हभप चकोर महाराज बाविस्तक यावल, हभप विठ्ठल महाराज वासकर पंढरपूर, हभप चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि २९ रोजी सकाळी साडेनऊ ते १२ वाजेच्या दरम्यान हभप चैतन्य महाराज देगलुरकर यांचे कीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम होतील. संत सखाराम महोत्सव काळात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालायण, श्री एकनाथी भागवत पारायण, श्री दासबोध पारायण, संत सखाराम महाराज चरित्र पारायण, श्रीगजाननविजय ग्रंथ पारायण, श्रीगुरूचरित्र पारायण, श्री भागवत संहिता पारायण, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पाठ याच बरोबर चतुर्वेद पारायण देखील होईल. सद्गुरू संत सखाराम महाराज व्दिशताब्दी समाधी सोहळ्याच्या औचित्याने कीर्तन, प्रवचन, १०८ कुंडात्मक श्रीमहाविष्णु पंचायतन महायाग अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.