अमळनेर- शहरातील बोहरी पेट्रोल पंपाचे मालक बाबा बोहरी उर्फ अली अजगर बोहरी (50, न्यू प्लॉट, अमळनेर) यांच्या हत्येनंतर व्यापारीवर्ग धास्तावला असून दिड वर्षात तब्बल तीन जणांचे शहरात खून झाल्याने शहरात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याची उघड टिका जनमानसातून होवू लागली आहे. मृत बोहरी यांच्या मृतदेहाचे धुळ्याच्या हिरे शासकीय महाविद्यालयात शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले तर त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपर अधीक्षकांचे ठाण ; पथके रवाना
गुरुवारी रात्री ते पंपावर हिशोब करून घराकडे निघालेल्या बाबा बोहरी यांच्यावर उद्यानाजवळ दबा धरून बसलेल्या तीन ते चार मारेकर्यांपैकी एकाने गोळी झाडली होती. छातीच्या डाव्या बरगडीत ही शिरल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी रात्री अडीच वाजता अमळनेर गाठून घटनास्थळाची पाहणी करीत तपासाबाबत सूचना केल्या. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही शुक्रवारी दाखल झाले असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे तर अपर अधीक्षकांसह स्थानिक पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
हत्येच्या बाबीला अनेक कंगोरे
मृत बाबा बोहरी यांची हत्येला अनेक कंगोरे आहेत. पूर्व वैमनस्यासह रेकॉर्डवरील एका आरोपीने बोहरी यांच्याकडे पैशांची मागणी केली होती व ती पूर्ण न झाल्यानेच त्याने गोळी झाडली असावी या शक्यतेच्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी गोळीबार नेमका कशामुळे झाला? याबाबत मात्र कारणांचा शोध सुरू असल्याचे सांगत सर्व बाबींनी शक्यता पडताळून पाहत असल्याचे सांगितले. घटनास्थळ परीसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊनही मारेकर्यांचा शोध सुरू असल्याचे अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव ‘जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.
दिड वर्षात तिसरा खून
अमळनेरात खून झाल्याची दिड वर्षातील ही तिसरा घटना आहे. 6 डिसेंबर 2016 रोजी दिनेश सोनार यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता तर 4 मार्च 2018 रोजी प्रा.दीपक पाटील यांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील संशयीत अद्यापही पसार असतानाच 4 रोजी मध्यरात्री बाबा बोहरी यांची हत्या करण्यात आली. शहरात वाढत्या गुन्हेगारीबाबत आमदार स्मिता वाघ व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर टिका केली.
मृतदेहावर धुळ्यात शवविच्छेदन
मयत बोहरी यांचा मृतदेह अमळनेर रुग्णालयातून पंचनामा केल्यानंतर शुक्रवारी पहाटे धुळे येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले तर शुक्रवारी दुपारी बोरी नदी काठावरील बोहरा समाजाच्या स्मशानभूमीत मृत बोहरा यांच्या मृतदेहावर दफनविधी केला जाणार आहे. मृत बोहरी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, लहान बंधू असा परीवार आहे. मोहम्मद अल्ली बोहरी यांचे ते मोठे बंधू होत.