चंडीगढ – ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेत आहेत. याच अभियानाचा भाग म्हणून शाह आज चंडीगढमध्ये दाखल झाले आहेत. आज दिवसभरात ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग, हॉकीपटू बलबीर सिंग यांची शाह भेट घेतील. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाची आखणी केली आहे. या अभियानांतर्गत शाह स्वत: विविध क्षेत्रातील ५० नामवंतांची भेट घेणार आहेत.
मुंबई दौऱ्यावेळी शाह यांनी उद्योगपती रतन टाटा आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेतली होती. प्रकृती अस्वस्थामुळे ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रस्तावित भेट होऊ शकली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने नुकताच चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. याकालावधीत सरकारने घेतलेल्या योजनांची तसेच सुरू असलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविणे हे संपर्क अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार भाजप कार्यकर्त्यांना दहा मतदारांना भेटीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.