अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी म्होरका ठार

0

वाशिंग्टन- अमेरिकेने पाकिस्तानवर ड्रोन हल्ला करत तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाहला ठार केले आहे. याआधीही नोव्हेंबर २०१३ मध्ये अमेरिकेने असाच हल्ला करत तबाही-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) हाकिमुल्ला मेहसूदचा खात्मा केला होता. अमेरिकेने १३ जूनला हा हल्ला केला होता. मात्र त्यावेळी मुल्ला फजल उल्‍लाह मारला गेल्यासंबंधी अधिकृत माहिती मिळाली नव्हती. शुक्रवारी अमेरिकेतील न्यूज एजन्सी वॉइस ऑफ अमेरिकेने कमांडर ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अमेरिकेला पाकिस्तान बॉर्डरवर तहरीक-ए-तालिबानचा नवा कमांडर आपल्या काही सहकाऱ्यांसोबत उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर लगेचच अमेरिकेने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर कुनार प्रांतात ड्रोन हल्ला करत तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाहला ठार केले.

डिसेंबर २०१४ मध्ये मुल्ला फजल उल्‍लाहने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला केला होता. पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १३० मुलांसोबत एकूण १५१ जण मारले गेले होते. अशीही माहिती आहे की, २०१२ मध्ये मुल्ला फजल उल्‍लाहलाने मलालाच्या अपहरणाचा आदेश दिला होता. मात्र हा प्रयत्न फसला होता. सर्वात कमी वयात नोबल पुरस्कार मिळवणाऱ्या मलालाने टीटीपी आणि मुल्ला फजल उल्‍लाहविरोधात उघडपणे भाष्य करत टीका केली होती.