अमित शाह जाणार मातोश्रीवर

0
मुंबई  :- २०१९ आगामी निवडणूक लक्षात घेता भाजपाध्यक्ष अमित शाह हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शाह हे उद्या मुंबईत संपर्क दौऱ्यासाठी येणार आहेत. यावेळी ते मातोश्रीवर जाऊन संध्याकाळी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. २०१९ निवडणूक एकत्र लढण्यासंबंधी उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती असण्याची शक्यता आहे.
केंद्रात सत्तेत आल्यापासून शिवसेनेला काडीची किंमत न देणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आता स्वत: मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.  मुंबईत आल्यावर मातोश्रीवर जाण्यास नेहमी टाळाटाळ करणारे अमित शाह मातोश्रीवर जात असल्या कारणाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करत होते. उद्धव ठाकरे युती तोडतील अशी चर्चा सुरु होती, मात्र तसे काही झाले नाही. भाजपा मात्र कर्नाटक विधानसभा तसंच पोटनिवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर जाताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून स्वत: अमित शाह उद्धव ठाकरेंसोबत युती कायम ठेवण्याबद्दल चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.