नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ मधून अमिताभ बच्चन बाहेर!

0
सिनेमाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने निर्णय 
मुंबई – ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी स्लम सॉकर मोहिमेवर आधारित ‘झुंड’ या चित्रपटातून महानायक अमिताभ बच्चन यांनी माघार घेतली आहे. या सिनेमात बच्चन प्रमुख भूमिका करणार असल्याचे खुद्द नागराज मंजुळे यांनी फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केले होते. अमिताभसोबत काम करण्याचे नागराजचे स्वप्नदेखील होते. मात्र हे स्वप्न अपूर्णच राहणार असे दिसत आहे. ‘झुंड’ चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सतत अडथळे येताहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हे शूटींग सुरू होणे अपेक्षित होते. त्यानुसार अमिताभने तारखाही दिल्या होत्या. मात्र शूटींग सुरू होण्यास सतत अडथळा निर्माण होत राहिला. अखेर हा चित्रपट सोडण्याचा निर्णय अमिताभने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसापूर्वी पुणे विद्यापीठाच्या परिसरात ‘झुंड’ चित्रपटाचा सेट उभा करण्यात आला होता. मात्र यावर कारवाई झाली आणि संपूर्ण सेट मोडावा लागला. ‘ठग्स ऑफ हिंदोस्ताँ’ या चित्रपटाचे शूटींग संपवून अमिताभ मुंबईला परतले तेव्हा ‘झुंड’ चित्रपटाची तारीख त्यांच्या हातात होती. पण शूटींग होऊ शकले नाही. त्यामुळे दुसऱ्या निर्मात्यांचीही अडचण होते. म्हणूनच अमिताभ यांनी ‘झुंड’ चित्रपटातून अंग काढून घेतल्याचे समजते. सतत सिनेमाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यांनी नागराज मंजुळे आणि निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही परत केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
‘झुंड’ चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकीय पदार्पण करणार आहेत. पहिल्याच चित्रपटात अमिताभसोबत काम करण्याची संधी नागराज यांना मिळाली होती. मात्र परिस्थितीने त्यांना साथ दिलेली नाही. ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ विजय बोरसे यांची व्यक्तीरेखा साकारणार होते. झोपडपट्टीतील मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी, त्यांना फुटबॉल शिकवणाऱ्या विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित याचा कथाभाग आहे. यात स्लम सॉकर लिगमध्ये खेळणारे खरे खेळाडू अमिताभसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार होते. नागराज यांनी अमिताभ यांचे कास्टिंग खूप विचारपूर्वक केले होते. अमिताभ यांना फुटबॉलची आवड आहे. याचा फायदा चित्रपटाला होणार होता. आता अमिताभच्या जागी दुसरा कोण अभिनेता काम करणार ? नागराजच्या या ‘झुंड’चे नेमके शूटींग कधी सुरू होणार ?  हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात झुंड सिनेमाच्या चित्रीकरणासाठी नागराज मंजुळे यांनी विद्यापीठाच्या मैदानातील काही भागावर सेट उभा केला होता. हा चित्रपट खेळावर आधारित असल्याने विद्यापीठाकडून त्याचा सहानभूतीपूर्वक विचार करत, त्याला परवानगी देण्यात आली होती.  मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला.   विद्यापीठाच्या जागेचा व्यावसायिक वापर झाला असून, लीजच्या कराराचा भंग झाल्याचा ठपका पुणे शहर तहसिल कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे सिनेमाचा सेट सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानातून हटवण्याचा आदेश विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिला होता.