मुंबई:बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात तब्बल ७० कोटी रुपयांचा कर भरला आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रवक्त्यांकडून ही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. अमिताभ यांनी ७० कोटींचा कर भरला असून जम्मू-काश्मीरमध्ये पुलावामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबाना प्रत्येकी १० लाखांचा मदतनिधी देखील दिला आहे. त्याशिवाय बिहारच्या मुजफ्फरपूर येथील २,०८४ शेतकऱ्यांचे कर्जही त्यांनी फेडल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्याने दिली.
अमिताभ बच्चन या वर्षी ‘बदला’ या सिनेमात दिसले. तर ‘ब्रम्हास्त्र’ हा त्यांचा येऊ घातलेला सिनेमा असणार आहे. ख्रिसमसमध्ये ब्रम्हास्त्र सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी अटकळ बांधली जात आहे. अमिताभ यांच्यासोबत या सिनेमात रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, बिग बी लवकरच तामिळ सिनेमातही पदार्पण करणार आहेत.