कोळदा येथे शेतात अज्ञात महिलेचा कटरने खून

नंदुरबार तालुका पोलिसात अज्ञाताविरुध्द गुन्हा

नंदुरबार l तालुक्यातील कोळदा शिवारातील एका शेतात अज्ञात महिलेचा धारदार शस्त्राने खून करून शेतात फेकुन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी, १ मे रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी अज्ञाताविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे, तालुक्यातील कोळदा शिवारातील नरोत्तम पाटील यांच्या बाजरीच्या शेतात अनोळखी महिलेचा धारदार कटरच्या सहाय्याने

अज्ञात कारणाने खून करून फेकुन दिला होता. दरम्यान, ही बाब मजुरांना कळताच त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क केला. ही घटना वाऱ्यासारखी पसरताच या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना देण्यात आली. त्यांनीही तात्काळ तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. यावेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, आदी पोलीस कर्मचारी होते. याप्रकरणी ईश्वर दोध्या मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पो. नि. राहुलकुमार पवार करीत आहेत.